Suraj Chavan | मागील 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ आता संपला आहे. बारामतीचा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयानंतर राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. बारामतीमधील सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये येण्यास उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले. त्याच्यावर बरीच टीका देखील झाली. पण, महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. अखेर सुरजने बिग बॉसच्या पाचव्या सीजनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. (Suraj Chavan )

अनेक अडचणींवर मात करून सुरजचे हे यश मिळवलंय. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीचं निधन झाल्याने सूरजला शिक्षण घेता आलं नाही. मोठ्या बहिणीने याचा सांभाळ केला. ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी आणि अंकिता त्याला सगळे टास्क समजावून सांगायचे. त्यातच  पंढरीनाथ आणि सूरजच्या मैत्रीची तर प्रचंड चर्चा रंगली होती.

विजयी झाल्यानंतर सुरजने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मी मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार, ते आता खरं ठरलं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!”

सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?

बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना.गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. जिंकलेल्या रक्कमेचे सुरज काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर त्याने मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार असल्याचं सुरज म्हणाला. (Suraj Chavan )

अभिजीत सावंतला किती रुपये मिळाले?

बिग बॉस मराठीचा रनर अप अभिजीत सावंतला पु. ना. गाडगीळ यांच्याकडून एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.

जान्हवी किल्लेकरला 9 लाख रुपये-

जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले आहेत. (Suraj Chavan )

Post a Comment

Previous Post Next Post